मुंबईतील सफाई कामगारांच्या विस्‍थापन भत्त्यात ६ हजाराची वाढ

मुंबई – मुंबई महापालिकेच्‍या आश्रय योजने अंतर्गत घनकचरा व्‍यवस्‍थापन खात्‍यातील सफाई कामगारांच्‍या वसाहतींचे पुनर्वसन करताना देण्‍यात येणाऱ्या विस्‍थापन भत्त्यामध्‍ये १ जुलैपासून ६ हजार रूपयांची वाढ करण्‍यात आली आहे. त्यामुळे आता सफाई कामगारांना दरमहा विस्थापन भत्ता २० हजार रुपये मिळणार आहे.

तांत्रिक व प्रशासकीय बाबींची पूर्तता करून सप्‍टेंबर २०२४ च्‍या मासिक वेतनात जुलै व ऑगस्‍ट या दोन महिन्‍यांच्‍या फरकाच्या रकमेसह संपूर्ण वाढीव रक्‍कम वेतनाद्वारे दिली जाणार आहे.महापालिकेचा सेवा सदनिकाधारक सद्यस्थितीत सफाई कामगाराला विस्‍थापन भत्ता आणि घरभाडे भत्ता असे मिळून १४ हजार रुपये अदा करण्‍यात येतात.यात ६ हजार रूपयांची वाढ करण्याची घोषणा नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने विस्‍थापन भत्त्यात सहा हजारांची वाढ केली आहे. त्‍यामुळे सफाई कामगारांना आता दरमहा २० हजार रुपये मिळणार आहेत.