शिष्यवृत्ती योजना परीक्षा येत्या ६ डिसेंबर रोजी होणार

मुंबई – राज्य परीक्षा परीषदेमार्फत घेण्यात येणारी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा २२ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना ५ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान नियमित शुल्कासह तर ५ ते ९ नोव्हेंबरदरम्यान विलंब शुल्कासह आणि १० ते १४ नोव्हेंबरदरम्यान अतिविलंब शुल्कासह आवेदनपत्रे भरता येणार असल्याचे परीक्षा परीषदेने जाहीर केले आहे. आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी संबंधित योजनेतून वर्षाला १२ हजार रूपयांची शिष्यवृत्ती दिली जाते.परीक्षेसाठी इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे व त्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न साडेतीन लाखांपेक्षा कमी असणारे अर्जास पात्र ठरतात.शिष्यवृत्तीसाठी निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येते.२२ डिसेंबरला राज्यभरात ही परीक्षा होणार आहे.बौद्धिक क्षमता चाचणी व शालेय क्षमता चाचणी अशा दोन विषयांच्या पेपरचा समावेश असतो.