पक्षाविरोधात वक्तव्य केल्याने बडगुजरांची उबाठातून हकालपट्टी

नाशिक – ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. काही दिवसांपासून बडगुजर भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अशातच मातोश्रीकडून हा निर्णय घेण्यात आला. बडगुजर यांनी पक्षविरोधी भूमिका मांडल्यामुळे ही कारवाई केल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
बडगुजर आणि दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्ता यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी २०२३ मध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष तपास पथक नेमले होते. त्यावेळी भाजपने बडगुजर यांच्यावर टीका केली होती. तरीही काही दिवसांपूर्वी बडगुजर यांनी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विशेष म्हणजे ही भेट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नाशिकमध्ये असताना झाली. त्यानंतर बडगुजर यांनी उघडपणे पक्षातील नाराजी जाहीर केली, त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला होता. आता ज्या बडगुजर यांच्यावर टीका केली त्यांनाच वाॅशिंग मशीनमध्ये घालून भाजपात घेतले जाणार आहे.
आज नाशिकचे उबाठाचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड आणि इतर नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान संजय राऊत यांचा फोन आला आणि उद्धव ठाकरे यांनी बडगुजर यांची हकालपट्टी केल्याचे सांगण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख डी जी सूर्यवंशी म्हणाले की, काल मंत्री गिरीश महाजन बडबडले की शिवसेना रहाणार नाही , पण शिवसेनेमुळे भाजपा वाढली. तुम्हाला पालकमंत्री देता येत नाही आणि तुम्ही पक्ष संपवण्यास निघालात का ? ही शिवसेना कधीच संपणार नाही. भाजपाने मागील काही दिवसांपूर्वी बडगुजर यांचे सलीम कुत्ता प्रकरण बाहेर काढले मग आता त्यांना मुख्यमंत्री भेट का देतात? नाशिकमध्ये शिबिर झाले त्यानंतर कसली नाराजी? सुधाकर बडगुजर वैयक्तिक कामासाठी बाहेर आहेत. सुधाकर बडगुजर संभ्रमात आहेत.
या कारवाईवर सुधाकर बडगुजर म्हणाले की, मी पक्षाविरोधात वक्तव्य केलेले नाही. पक्षात नाराजी व्यक्त करणे गुन्हा असेल तर तो मी केला आहे. मात्र त्या गुन्ह्याची शिक्षा थेट हकालपट्टी असेल, तर त्यावर मी काय बोलणार? न्यायालयातसुद्धा एकतर्फी निर्णय होत नाहीत. मुख्यमंत्र्यांना भेटल्यावरून जर माझ्यावर कारवाई होत असेल तर ती चुकीची आहे.