लक्ष्मण हाकेंनी पगार दिला नाही! ड्रायव्हर बंडकरांचा आंदोलनाचा इशारा

मुंबई – ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी त्यांचा ड्रायव्हर सचिन बंडकर यांना दोन वर्षांचा पगार दिला नाही . राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक्सवर पोस्ट करून ही माहिती दिली . यावर सचिन बंडकर यांनी देखील प्रतिक्रिया देत पगार न दिल्यास कुटुंबासह मंत्रालयासमोर आंदोलन करू असा इशारा दिला आहे.
सचिन बंडकर म्हणाले की, मी लक्ष्मण हाके यांच्याकडे ५ वर्षे काम केले. ते समाजासाठी काम करत आहेत या भावनेतून मी तब्बल ३ वर्षे पगार न घेता काम केले. मी त्यांच्याकडे कधीही पगाराची मागणी केली नव्हती. पण काम सोडताना त्यांनी मला पगार देण्याचे आश्वासन दिले. तरी देखील गेल्या २ वर्षांपासून मला पगार मिळालेला नाही. हाके यांनी माझ्या पत्नीला नोकरी देण्याचेही आश्वासन दिले होते. पण ती नोकरी मिळाली नाही. माझा मुलगा आजारी आहे म्हणून मला माझा पगार द्या असे मी त्यांना म्हटले , पण त्यांनी माझ्या भावाला धमकावले . जर माझ्याकडे न्यायालयात जाण्याची आर्थिक ताकद असती तर मी पगाराची मागणी का केली असती? अमोल मिटकरी नक्कीच मला न्याय मिळवून देतील अशी मला अपेक्षा आहे. जर मला पगार दिला नाही, तर मी कुटुंबासह मंत्रालयासमोर लक्ष्मण हाके यांच्या विरोधात आंदोलन करीन. मला माझा प्रामाणिकपणे मिळणारा पगार द्यावा, हीच माझी विनंती आहे.