सांगलीत राजकारण करून चंद्रहार पाटील शिंदे गटात

सांगली – डबल महाराष्ट्र केसरी आणि ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील हे सोमवारी ९ जूनला शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. याबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते व मंत्री संजय शिरसाट यांनी अधिकृत घोषणा केली असून, हिम्मत असेल तर हा प्रवेश थांबवा, असे आव्हान त्यांनी ठाकरे गटाला दिले आहे. संजय शिरसाट म्हणाले की, सोमवारी आमच्या पक्षामध्ये अनेक लोकांचा प्रवेश होणार आहे. डबल केसरी चंद्रहार पाटील हा सोमवारी शिंदे गटात प्रवेश करणार आहे. हिंमत असेल तर प्रवेश थांबवा. कारण त्यांच्याकडे कोणीही राहण्याच्या मनःस्थितीत नाही.

३० मे रोजी सांगलीच्या भाळवणी येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत चंद्रहार पाटील यांनी बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी सामंत यांना चांदीची गदा भेट दिली होती. त्यानंतरच त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा रंगू लागल्या होत्या, त्यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे. मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने सांगलीतून अचानक चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. या निर्णयामुळे काँग्रेसचे इच्छुक विशाल पाटील अडचणीत आले होते. त्यांनी उमेदवारी मागे घेण्याची मागणी केली होती. मात्र, खासदार संजय राऊत यांनी चंद्रहार पाटील यांचाच आग्रह धरला. परिणामी, विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि तिरंगी लढतीत विजय मिळवला. चंद्रहार पाटील यांचे डिपॉझिट जप्त झाले. त्यांना केवळ ६०,८६० मते मिळाली. ज्या चंद्रहार पाटील यांच्यासाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी काँग्रेससोबत वितुष्ट घेतले त्यांनीच पक्षाला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे.