मुंबई –राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam)यांच्या आईच्या नावावर असलेल्या सावली या डान्सबारचा (savali Dance Bar) मुद्दा उबाठाचे (UBT) आमदार अनिल परब (MLA Anil Parab) यांनी उचलून धरला आहे. परब यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील गृहराज्यमंत्र्यांच्या स्वत:च्या आईच्या नावाने डान्सबार चालतो. त्यावर कारवाई कोण करणार? अशाप्रकारे डान्सबारमध्ये पोरी नाचवून अश्लिलता पसरावायला लाज वाटत नाही का? असा घणाघात केला.
परब म्हणाले की, कांदिवलीत पोलीस (Police) स्टेशनच्या नाकाखाली हा बार चालतो आहे. योगेश कदम हे स्वतः नवी मुंबईत डान्सबारव धाड टाकतात आणि स्वतःच्या आईच्या नावावर चालणाऱ्या बारकडे दुर्लक्ष करतात. हा बार त्यांच्या आईच्या नावावर असल्याचे खुद्द रामदास कदम यांनी मान्य केले आहे. बारच्या मालकीबाबत कोणताही संभ्रम राहिलेला नाही. या बारवर पडलेल्या धाडीत २२ बारबाला, २२ ग्राहक आणि ४ कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली. बारमध्ये अश्लील नृत्य सुरू असतानाच पोलिसांनी ही कारवाई केली होती. ही माहिती पोलिसांच्या एफआयआरमध्ये आहे आणि मला माहितीच्या अधिकारातून मिळाली आहे. त्यामुळे ती माहिती खोटी असण्याचा प्रश्नच येत नाही. आज गृहमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही सगळे कागदपत्रे भेटरूपाने देणार होतो. पण ते मुंबईबाहेर असल्याने उद्या भेटून सर्व पुरावे त्यांच्याकडे सुपूर्द करेन. त्यांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करेन.