छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल विट्सच्या लिलावात सर्वाधिक बोली लावणाऱ्या न्यायमंत्री संजय शिरसाट (Minister Sanjay Shirsat)यांचे चिरंजीव सिद्धांत शिरसाट (Siddhant Shirsat,)यांच्या सिद्धांत मटेरियल प्रोक्युअरमेंट अँडसप्लाइज या कंपनीने अंतिम टप्प्यातून माघार घेतल्याचा या हॉटेलचे मालक असलेल्या धनदा कॉर्पोरेशनला मोठा फटका बसला आहे. आता ही लिलाव प्रक्रिया पुन्हा नव्याने राबवावी लागणार आहे. यासंदर्भातील अहवाल विशेष न्यायालयात सादर केला असून पुढील सुनावणी ५ जुलै रोजी होणार आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरच पुढील लिलाव प्रक्रिया घेतली जाणार आहे.
याबाबत उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांनी सांगितले की, न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. धनदा कॉर्पोरेशनकडून (Dhanada Corporation)फसवणूक झाल्याचा आरोप करत सुमारे ३५० गुंतवणूकदारांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, जिल्हा प्रशासनाने कंपनीच्या मालकीतील रेल्वे स्थानकाजवळील हॉटेल आणि त्यालगतच्या मोकळ्या जागेचा लिलाव आयोजित केला होता. लिलावाची ही प्रक्रिया सातव्यांदा राबवण्यात आली होत्या. यात सिद्धांत मटेरियलप्रोक्युअरमेंट अँड सप्लाइज, निर्मल हॉलिडे होम आणि कल्याणटोल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या तीन कंपन्या सहभागी झाल्या होत्या. सिद्धांत कंपनीने दोन्ही मालमत्तांसाठी बेस प्राइसपेक्षा प्रत्येकी १५ लाख रुपये अधिक बोली लावली होती. त्यांची बोली प्रशासनाने मंजूर देखील केली होती. मात्र विट्स हॉटेलच्या लिलावावरून राज्यातील संजय शिरसाट यांच्यावर आरोप करण्यात आले. त्यामुळे सिद्धांत मटेरियल प्रोक्युअरमेंट अँडसप्लाइज या कंपनीने लिलावातून माघार घेतली. आता पुढील निर्णयासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरच पुढील लिलाव प्रक्रिया केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.