बांग्लादेशींच्या झोपड्या वाचवायला आदित्य ठाकरेंचा खोटा आरोप ! कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा सवाल

Mangal Prabhat Lodha

मुंबई – कुर्ल्यातील महाराणा प्रताप (Maharana Pratap)शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI campus) परिसरातील जंगल तोडून स्विमिंग पूल (swimming pool)बांधत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)यांनी केल्यानंतर कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. तिथे स्विमिंग पूल नव्हे, तर शिवकालीन पारंपरिक खेळांचे मैदान उभे राहत आहे. आदित्य ठाकरेंचा खरा उद्देश त्या परिसरातील रोहिंग्या-बांगलादेशींच्या अनधिकृत झोपड्यांना वाचवण्याचा आहे का? असा सवाल मंत्री लोढा (Mangal Prabhat Lodha)यांनी उपस्थित केला आहे.

कुर्ल्यातील आयटीआय परिसरात मागील दोन महिन्यांपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावे एक पारंपरिक मराठमोळं खेळांचे मैदान तयार होत आहे. येत्या १३ ऑगस्टला त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य देशी आणि पारंपरिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन होणार आहे. आयटीआयच्या विद्यार्थ्यांना त्रास न होता, इतर खेळाडूंना प्रवेश मिळावा याकरिता मागील बाजूला पायवाट व द्वार बांधण्याचे काम सुरू झाले होते.

या पायवाटेमुळे आयटीआयच्या बाहेरील बाजूला वाढलेल्या रोहिंग्या-बांगलादेशींच्या (Rohingyas and Bangladesh) अनधिकृत झोपड्यांना अडथळा होईल ही भीती आदित्य ठाकरे यांना वाटत असावी. मुंबईत प्रथमच मराठमोळे पारंपरिक खेळांचे मैदान होत आहे, त्याचे स्वागत करण्याऐवजी, रोहिंग्या-बांगलादेशींच्या अनधिकृत झोपड्यांना वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न का? असा प्रश्न लोढा यांनी यावेळी विचारला आहे.