मुंबई – भाषेच्या नावे दहशत पसरवली तर महाराष्ट्रात गुंतवणूकदार येतील का? असा सवाल महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (Maharashtra Governor C. P. Radhakrishnan) यांनी केला आहे.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी भाषावादाच्या प्रश्नावर भाष्य करताना म्हटले की, मी रोज वाचतो की, मराठीत (Marathi) बोलत नाही म्हणून लोकांना मारहाण केली जाते. मी खासदार असताना तमिळनाडूतही (Tamil Nadu) असाच वाद झाला होता. काही लोकांना जमावाकडून मारहाण झाली होती. तेव्हा मी स्वतः गाडी थांबवली होती. मला पाहून काही लोक पळाले. केवळ तमिळ भाषा येत नसल्याने त्यांना मारहाण करण्यात आली होती. माझ्या मराठी न येण्यामुळे जर मला कोणी मारहाण केली, तर मी लगेच मराठी बोलू शकेन का? भाषेच्या नावाखाली जर दहशत पसरवली जात असेल, तर महाराष्ट्रात गुंतवणूकदार (Investment) कसे येतील? मुळात भाषेवरून वाद घालण्यात काही अर्थ नाही. आपण या गोष्टींमुळे महाराष्ट्राला दीर्घकाळ वेदना देतो आहोत. भाषा ही राजकीय पोळी भाजण्याचा मुद्दा नाही. मला हिंदी (Hindi) येत नाही, ही माझी अडचण आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की इतरांना कमी लेखावे. प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान असायलाच हवा. त्यात तडजोड नको. माझ्यासाठी माझी मातृभाषा महत्त्वाची आहे. तसेच ती प्रत्येक मराठी माणसासाठीही आहे.