मुंबई – रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत (Mahayuti alliance) सुरू असलेली रस्सीखेच आता ध्वजारोहण कार्यक्रमापर्यंत पोहोचली आहे. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा (guardian minister) तिढा सुटला नसतानाच राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी नाशिक सोडून गोंदियातील ध्वजारोहण कार्यक्रमाला जाण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता गोंदियात ध्वजारोहणाची जबाबदारी मंत्री मंगल प्रभात लोढा (Minister Mangal Prabhat Lodha) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे (NCP)तीन आणि शिंदे गटाचा (Shinde faction)एक मंत्री असताना, जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असल्याचा दावा करत राष्ट्रवादीने पालकमंत्रिपदासाठी इच्छा व्यक्त केली. तर शिवसेनेच्या वतीने ही जबाबदारी मंत्री दादा भुसे (Minister Dada Bhuse)यांच्याकडे द्यावी, अशी मागणी झाली होती. तर भाजपा कुंभमेळ्याचे (Kumbh Mela)महत्त्व लक्षात घेऊन पालकमंत्रिपद सोडण्यास तयार नाही.
दरम्यान यंदाही १५ ऑगस्टला मुख्य कार्यक्रमासाठी ध्वजारोहणाची जबाबदारी गिरीश महाजन (Minister Girish Mahajan)यांना देण्यात आली. तर गोंदियात ध्वजारोहणासाठी छगन भुजबळ यांचे नाव जाहीर झाले होते. याआधी २६ जानेवारी आणि १ मे महाराष्ट्र दिनी नाशिकमध्ये ध्वजारोहणाचा मान गिरीश महाजन यांनाच देण्यात आला होता.नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे तब्बल सात आमदार असतानाही, गोंदियाला का जायचे अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ध्वजारोहणास जाणार नसल्याचे कळवले. त्यानंतर आज शासनाने नवीन परिपत्रक काढले.