फडणवीसांना वाटते ते मदारी आहेत! खा. राऊतांचा टोला

sanjay Raut

मुंबई –दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी भेट घेतली होती. या भेटीचे विविध अर्थ लावले जात आहेत. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीस यांना मदारी म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे. असल्या भेटींमुळे काही फरक पडणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे यांच्या भेटीत काय चर्चा झाली त्याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. फडणवीस यांना वाटते आहे की ते मदारी आहेत आणि सगळ्यांना नाचवू शकतात. पण हे नुसते त्यांचे वाटणे आहे. त्यांच्या हाती सत्ता आहे, बिल्डर लॉबी आहे, पैसा आहे, भ्रष्टाचार करु शकता म्हणून सगळ्यांना तुम्ही नाचवू शकता ही तात्पुरती फेज आहे. पण ठाकरे ब्रांड हा मुंबई आणि महाराष्ट्राचा (Maharashtra) ब्रँड आहे. मोदी-शहा असोत किंवा देवेंद्र फडणवीस असो कुणीही हा ब्रँड (Brand) संपवू शकत नाही. हा ब्रँड अजिंक्य आहे. लोकांच्या मनात आजही बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियाविषयी आदर आहे. कारण महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी ठाकरे कुटुंबाने त्याग केला आणि संघर्ष केला आहे. त्याची तुलना कुणाशी होऊ शकत नाही. विधानसभा निवडणूक लबाडी करुन जिंकलात. महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने तीच तयारी सुरु आहे , पण लोक सूज्ञ आहेत.

इस्त्रायल आणि इराण युद्धावर राऊत म्हणाले की, आता इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध (Israel and Iran War) सुरू झाले असून ते दोन्ही अण्वस्त्रसज्ज आहेत. हे दोन्ही देश युद्धासाठी मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रांचा (Missiles) वापर करत आहेत. आता ट्रम्प (Donald Trump) यांनी पुढाकार घेत इस्रायल- इराण युद्ध थांबवावे. त्यांनी मोदी- शहांना धमकी देऊन युद्ध थांबवले होते. मात्र, आता ट्रम्प इस्रायल- इराणमधील युद्ध थांबवत का नाहीत?