जालना- मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे-पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करणार आहेत. ते उद्या सकाळी 10 वाजता आंतरवाली सराटी येथून मुंबईकडे रवाना होणार आहेत. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना आझाद मैदानात आंदोलन करण्यास परवानगी नाकारली आहे. त्यांना नवी मुंबईतील खारघर किंवा अन्य ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. यामुळे जरांगे-पाटील यांची कोंडी झाली असली तरी ते मुंबईतील आंदोलनावर ठाम आहेत.
मुंबईतील आझाद मैदानात मोठ्या प्रमाणावर आंदोलक जमल्यास जनजीवन विस्कळीत होईल. त्यामुळे आझाद मैदानामध्ये उपोषण आंदोलन करण्यास मनाई करावी, अशी जनहित याचिका एएमआय फांऊडेशनचे अनिलकुमार मिश्रा यांनी वकील महेंद्र रत्न यांच्यामार्फत केली होती. या याचिकेवर आज मुख्य न्या. आलोक आराधे व न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ व मुख्य सरकारी वकील पूर्णिमा कंथारीया यांनी युक्तिवाद केला की, उद्यापासून गणेशोत्सव सुरू होत आहे. मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असल्याने आधीच मोठी गर्दी असते. या परिस्थितीत मनोज जरांगे- पाटील यांनी मुंबईत येऊन आझाद मैदान येथे आंदोलन केले तर प्रशासनावर प्रचंड ताण येईल. आंदोलनासाठी त्यांना नवी मुंबईतील विशिष्ट जागा निश्चित करून दिली जाऊ शकते. शिवाय आझाद मैदानातील कोणत्याही आंदोलनाच्या बाबतीत कमाल 5 हजार लोकांच्या जमावासह अनेक अटी घालणारी अंतिम नियमावली राज्य सरकारने यापूर्वीच उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जारी केलेली आहे. ती नियमावली आजच अधिसूचित केली जाईल.
न्यायालयाच्या या आदेशावर मनोज जरांगे म्हणाले की, लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्याचा आम्हाला हक्क आहे. परवानगी नाकारणे हे लोकशाहीच्या विरोधात होत आहे. हे देवेंद्र फडणवीस यांचे षड्यंत्र आहे. ते तोडून काढायला मी खंबीर आहे. न्यायदेवता आम्हाला न्याय देईल. मी न्यायालयावर काही बोलणार नाही. पण मी सरकारला बजावतो की, मी मुंबईत येणार आहे. सरकारला मराठा समाजाचे कल्याण झालेले बघवत नाही. आम्ही शांततेत येणार आहोत. आमच्या मागण्या मान्य करा. मी माझ्या मुद्यावर आजही ठाम आहे. आझाद मैदानात आंदोलन करणारच आहे.
दरम्यान, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतरवाली सराटी येथे आपले स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळे यांना मनोज जरांगेंची भेट घेण्यासाठी पाठवले. त्यांनी गणेशोत्सव असल्याने आंदोलन पुढे ढकला, अशी विनंती जरांगेंना केली. यावर जरांगेंनी त्यांना उत्तर दिले की, मुंबईतील गणेशभक्तांना कोणताही त्रास होणार नाही. आम्हाला केवळ आझाद मैदानावर जाण्यासाठी कोणताही एक मार्ग द्या किंवा आम्हाला आरक्षण द्या. आमच्या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करा, तरच आम्ही मुंबईला येणार नाही. राजेंद्र साबळे म्हणाले की, मुंबईत पुढील 10 दिवस हे गणेशोत्सवाच्या धामधुमीचे असतील. या काळात मराठा मोर्चा मुंबईत आल्यास पेचप्रसंग आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी मला पाठवले होते. जरांगेंच्या संभाव्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासोबत मंत्रालयात बैठक झाली. मराठा समाजाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर आज त्यांनीही पहिली बैठक घेतली. या बैठकीत मराठा समाजाच्या मागण्यांवर चर्चा झाली. याचबरोबर न्या. संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, आजच्या बैठकीत मराठा समाजाच्या मागण्यांवर चर्चा केली. हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. याचा अभ्यास करण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ हवी होती ती मुदतवाढ आम्ही दिली आहे. मराठा आंदोलनात मृत पावलेल्या कुटुंबाला नोकरी द्या, ही मागणी जरांगेंनी केली होती. त्यानुसार आता उरलेल्या 9 जणांना एसटी महामंडळात 3 महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करून नोकरी देऊ. मविआ सरकार आरक्षण टिकवू शकले नाही. जरांगे यांनी माजी मुख्यमंत्री शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना आरक्षणासाठी काय केले याचा जाब विचारला पाहिजे. मात्र जरांगे यांनी सगेसोयरे यांना आरक्षण मिळावे ही मागणी केली असून त्याबद्दल सरकार अडचणीत आले आहे.
