मुंबई – राज्यातील सरकारमधील मंत्र्यांची बेजबाबदार विधाने, वागणूक व भ्रष्टाचार हे उघड झाल्याने त्यांची मंत्रीमंडळातून ताबडतोब हकालपट्टी करा या मागणासाठी शिवसेना उद्धव बाळासहेब ठाकरे पक्षातर्फे आज राज्यभर जनआक्रोश आंदोलन केले गेले. मुंबईत या आंदोलनात उध्दव यांनी आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी पत्त्याचा मुगूट घातला, डान्सबारचे नाटकीय सादरीकरण केले, बनियन व टॉवेल नेसून मारहाणीचे नाट्य सादर केले , बनावट नोटांनी भरलेल्या अनेक बॅगा दाखवत अनोख्या पद्धतीने हे आंदोलन केले . त्यानंतर पत्रकार परिषदेत उध्दव ठाकरे यांनी दिल्लीत विरोधी पक्षाच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत नेत्यांना अटक केल्याचा धिक्कार केला .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई का करत नाहीत? त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी दादर येथील आंदोलनावेळी उपस्थित केला. महायुतीच्या सरकारमध्ये सामील असलेले माणिक कोकाटे, संजय शिरसाट, योगेश कदम, संजय गायकवाड, भरत गोगावले, मेघना बोर्डीकर यांची अनेक विधाने व प्रसंग चांगलेच वादग्रस्त ठरले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे राज्याच्या विविध भागात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून नंतर सोडून दिले . मुंबई, ठाणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, पुणे, अमरावती, नंदूरबार, कोल्हापूरसह अनेक शहरांमध्ये चौकाचौकात उबाठाचे कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी या आंदोलनात भाग घेतला. मुंबईत शिवाजी पार्क येथे स्व . मिनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ हजारोंच्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. या वेळी मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, भ्रष्टाचाराच्या विरोधात आज संपूर्ण राज्यातील जनता रस्त्यावर उतरली आहे. आपण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा व संताचा आहे असे म्हणतो आता तो भ्रष्टाचाऱ्यांचा झाला आहे. नितीमत्तेमध्ये या सरकारने महाराष्ट्राला अगदी शेवटच्या रांगेत नेऊन बसवले आहे. एकेकाळी मंत्र्यांवर आरोप झाल्यावर त्यांचे राजीनामे घेतले जायचे. आता त्यांना पाठीशी घातले जात आहे. हे सरकार जनताभिमुख आहे की पैसाभिमुख आहे? फडणवीस यांच्या मंत्र्यांविरोधात अंबादास दानवे व अनिल परब यांनी पुरावे दिले तरीही फडणवीस म्हणतात की आम्ही त्यांना समज दिली . म्हणजे काय तर पुढच्या वेळेस सावलीत बार उघडू नका, बँगा उघड्या टाकू नका अशी समज दिली असावी . इतके पुरावे देऊनही तुम्ही कारवाई करत नाहीत याचा अर्थ तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का? उद्या तुमच्यावर जनतेचा दबाव वाढला तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल. फडणवीसांकडे पाशवी बहुमत आहे. दिल्लीतून सहकार्य आहे .तरीही ते कारवाई करत नसतील तर त्यासाठी जनतेलाच पुढाकार घ्यावा लागेल .