मतचोरी केली ! मोदी सरकार घाबरट ? विरोधक आक्रमक ३०० खासदारांचे रस्त्यावर एकत्र आंदोलन ! शक्तीप्रदर्शन

नवी दिल्ली – लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने आज मतदार यादीतील गैरप्रकार आणि मतचोरीच्या आरोपावरून संसद भवन ते केंद्रीय निवडणूक आयोग कार्यालय असा मोर्चा काढला. या मोर्चात अभूतपूर्व एकी दाखवत विरोधी पक्षांचे ३०० खासदार सहभागी झाले. या मोर्चाला निवडणूक आयोग इमारतीपर्यंत जाऊ दिले नाही , मोर्चात खासदार असूनही त्यांना अडविले , ताब्यात घेतले आणि पोलीस स्टेशनला नेऊन मग सोडले . यावर प्रतिक्रिया देताना प्रियांका गांधी म्हणाल्या की हे सरकार घाबरट आहे.

दिल्ली पोलिसांनी बॅरिकेड लावून लगेचच मोर्चा अडवत राहुल गांधी यांच्यासह विरोधी खासदारांना अटक केली. त्यांना दोन तासांनी सोडून देण्यात आले. परंतु या मोर्चामुळे दिल्लीतील वातावरण ढवळून निघाले. या मुद्द्यावरून सरकारला आपली ताकद दाखवण्याचा ‘इंडिया’ आघाडीचा प्रयत्न यशस्वी ठरला.

राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. मागील लोकसभा आणि काही राज्यांतील विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी कशा प्रकारे झाली हे त्यांनी पुराव्यासह दाखवून दिले. या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांनी शपथपत्रावर आरोप करा, असे निर्देश दिले . मात्र, राहुल गांधी यांनी हा मुद्दा लावून धरला. इतर विरोधी पक्षांकडूनही त्याला पाठबळ मिळाल्याने आज मतचोरी विरोधातातील मोर्चाची घोषणा करण्यात आली होती. संसद ते निवडणूक आयोगाचे कार्यालय असा मोर्चा निघणार होता. पण सकाळी विरोधी पक्षांचे खासदार संसदेबाहेर जमण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांना पत्र पाठवून दुपारी १२ वाजता ३० जणांच्या शिष्टमंडळाला भेटायला बोलावले. जागेअभावी ही अट घालण्यात आल्याचे आयोगाने पत्रात नमूद केले होते. मात्र, विरोधकांनी सर्व खासदार एकत्र जातील, अन्यथा कोणीही जाणार नाही, अशी भूमिका घेतली. आम्ही केवळ बैठकीसाठी नाही, तर निवेदन सादर करण्यासाठी येणार आहोत, तिथे जागा कमी असेल तर हाॅलमध्ये ही बैठक घ्या असेही त्यांनी स्पष्ट केले.

निवडणूक आयोगाने त्याला प्रतिसाद न दिल्याने सकाळी ११ वाजता मोर्चाला संसद भवनाच्या मकरद्वारातून सुरुवात झाली. सेव्ह व्होटचे बॅनर आणि वोट चोर, गद्दी छोड अशा घोषणांसह खासदार निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या दिशेने कूच करू लागले. या मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आदी २५ पक्षांचे खासदार सहभागी झाले होते. राहुल गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, संजय राऊत, अखिलेश यादव, डिंपल यादव, शशी थरूर, जयराम रमेश, महुआ मोईत्रा, सयानी घोष आदि नेते मोर्चात होते. मोर्चा वाहतूक भवनाजवळ पोहोचताच दिल्ली पोलिसांनी बॅरिकेड लावून तो अडवला. यावेळी विरोधक आक्रमक झाले. तृणमूलच्या महुआ मोईत्रा आणि सयानी घोष यांनी बॅरिकेडवर चढून घोषणाबाजी केली. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी बॅरिकेडवरून उडी मारत पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला. काही खासदार तिथेच जमिनीवर ठिय्या देऊन बसले. काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला यांनी बोल रहा है पूरा देश वोट हमारा छूके देख अशी घोषणाबाजी केली. यादरम्यान महुआ मोईत्रा, तृणमूलच्याच मिताली बाग आणि काँग्रेसच्या संजना जाधव या तिघी जणी बेशुद्ध पडल्या. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या दरम्यान, मोर्चाला परवानगी नसल्याचे सांगून पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी, सुप्रिया सुळे, अखिलेश यादव, संजय राऊत यांसह अनेक खासदारांना ताब्यात घेत संसद मार्ग पोलीस ठाण्यात नेले. दोन तासांनंतर सर्वांना सोडण्यात आले. दरम्यान विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सकाळीच २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. त्यामुळे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर आम्हाला सोडण्यात आले, असा आरोप खासदारांनी केला.

नवी दिल्लीचे पोलीस उपायुक्त देवेश कुमार महाला म्हणाले की, ३० खासदारांना निवडणूक आयोगाची परवानगी होती. परंतु विरोधी पक्ष खासदारांची संख्या खूप जास्त होती. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर प्रियांका गांधी म्हणाल्या की, सरकार घाबरलेले आहे, डरपोक आहे. आमची एकजूट पाहून सरकारला घाम फुटला आहे. राहुल गांधी म्हणाले की, सत्य देशासमोर आले आहे. ही संविधानाची लढाई आहे . एक व्यक्ती, एक मत ही आमची भूमिका आहे. आम्हाला फक्त खरी मतदारयादी हवी आहे. ३०० खासदारांना निवडणूक आयोगाला भेटायचे होते, पण आयोगाने सांगितले की एवढे खासदार येऊ शकत नाहीत. हे लोक घाबरतात. ही लढाई आता राजकारणापलीकडे गेली आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रतिक्रिया दिली की, निवडणूक आयोगाने केवळ ३० सदस्यीय शिष्टमंडळाला बोलावले होते. पण ही आघाडी आहे, फक्त ३० सदस्य कसे पाठवणार? आयोगाने एका मोठ्या हॉलमध्ये बैठक घ्यायला हवी होती.

भाजपाकडे कल असल्याचा आरोप असलेले काॅंग्रेसचे शशी थरूर हेही आंदोलनात होते . ते म्हणाले की, आपल्या निवडणुकांच्या विश्वासार्हतेबाबत जनतेच्या मनात कोणतीही शंका राहू नये. निवडणूक आयोगाची केवळ देशाच्या बाबतीत नाही, तर स्वतःच्या बाबतीतही जबाबदारी आहे. जयराम रमेश म्हणाले की, आम्हाला पुढे जाऊ देत नाही, मध्येच थांबवले आहे. ही संविधानाची हत्या आहे. केसी वेणुगोपाल यांनीही सरकारवर निशाणा साधत म्हटले की, पोलीस आणि सरकार आम्हाला ३० सेकंदही मार्च करू देत नाहीत. ते आम्हाला इथे थांबवू इच्छितात. देशात कसली लोकशाही आहे? खासदारांना निवडणूक आयोगात जाण्याचे स्वातंत्र्य नाही का?

राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा हे पोलिसांनी अटक केल्यावर म्हणाले, आम्हाला कोणत्या गुहेत घेऊन जात आहेत माहीत नाही. यांच्या हृदयात जागा नाही, मनात घाण आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की,आम्ही शांततेत आंदोलन करत आहोत. महात्मा गांधींना आम्ही आपला आदर्श मानतो. संजय राऊत हे सरकारचे षडयंत्र असल्याचे सांगत म्हणाले की, आम्ही आयोगाची वेळ मागितली होती, पण आम्हाला आयोगाला भेटू दिले नाही.