मुंबई- उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे (Ubatha chief Uddhav Thackeray) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thak) यांच्या संभाव्य युतीवर सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असताना, उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज म्हणाले की, ठाकरे बंधूंच्या युतीबाबत खूप चर्चा झाली आहे आणि अजूनही होत आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील का, आणि पुढे काय करतील याबाबत वेळच उत्तर देईल. महानगरपालिका निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. त्या आधी लोकांच्या भावना आणि इच्छांचा सन्मान झाला पाहिजे. स्वतः राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न ते साकार करतील. उद्धव ठाकरेदेखील म्हणाले आहेत की, लोकांच्या मनात जे आहे ते होईल, आणि तुमच्याही मनात जे आहे ते होईल. त्यामुळे फार चर्चा करण्यापेक्षा योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जातील.
राऊत पुढे म्हणाले की, सत्ताधारी मूर्ख लोक आहेत, त्यांचे डोके ठिकाण्यावर आहे का? त्यांनी मुंबईला दिल्लीच्या वाटेवरचे पायपुसणे केले आहे. मुंबई मराठी माणसाची आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे. यांनी आम्हाला मुंबा देवीबद्दल सांगण्याची गरज नाही. गुजरातचे काही धनी शेठ लोक मुंबईला त्यांची बटीक बनवू इच्छित आहेत. मी काय शब्द वापरला त्यावर जाऊ नका, परिस्थितीवर बोला. धारावीच्या निमित्ताने अदानीला जी भूखंडाने आंघोळ घातली जात आहे त्यावर बोला. मुंबईतून मराठी माणसाला हद्दपार केले जात आहे त्यावर बोलले पाहिजे, हे होत नाही. मुंबई तुमची बटीक आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात काय उल्लेख केला होता हा इतिहास समजून घ्या. मुंबई लुटली जात आहे, मुंबईतून मराठी माणसाला हाकलण्याचे आणि ती तोडण्याचे कारस्थान सुरू आहे. धारावी हे त्यांचे उदाहरण आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ल्यासंदर्भात आता भाजपाकडून जल्लोष सुरू आहे, यांनी ते किल्ले बांधले आहेत का? यापूर्वी देखील महाराष्ट्रातील अनेक वास्तूंना हा दर्जा मिळालेला आहे. हे आम्हाला माहिती आहे, या गोष्टीचे राजकारण करू नका.