अजब गजब! केवळ बनावट दूतावासच नाही, तर थेट स्थापन केली ‘ईस्ट इंडिया कंपनी’; आर्थिक घोटाळ्यांचा कारनामा उघड

Ghaziabad Fake Embassy Case

Ghaziabad Fake Embassy Case: उत्तर प्रेदशमधील गाझियाबादमध्ये एका व्यक्तीने चक्क इतर देशांचे नाव वापरून बनावट दूतावास (Ghaziabad Fake Embassy Case) स्थापन केल्याची घटना समोर आली होती. या घटनेचा तपास करताना आता अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. हर्षवर्धन जैन (Harshvardhan Jain) नावाच्या या व्यक्तीने केवळ बनावट दूतावासच नाही तर थेट ‘ईस्ट इंडिया कंपनी’ची स्थापना केली होती.

हर्षवर्धन जैनचे हे बनावट साम्राज्य आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरले होते. या तपासात आर्थिक फसवणूक आणि मनी लाँडरिंगचे एक मोठे आंतरराष्ट्रीय जाळे उघड झाले आहे.

47 वर्षीय हर्षवर्धन जैनला गाझियाबादच्या कवी नगर परिसरातील एका आलिशान बंगल्यातून अटक करण्यात आली होती. तो स्वतःला काही देशांचा स्वयंघोषित राजदूत म्हणून सादर करत होता. त्याने राजनैतिक नंबर प्लेट असलेल्या गाड्या, बनावट कागदपत्रे आणि खोटे परदेशी संबंध वापरून लोकांना फसवले. नोकरीच्या संधी, काल्पनिक व्यवहार आणि मोठ्या कमिशनचे आमिष दाखवून त्याने अनेकांना गंडवल्याची माहिती समोर आली आहे.

शेल कंपन्यांचा खुलासा

उत्तर प्रदेश विशेष कार्य दलाने शोधून काढले की, जैनने युके, मॉरिशस, दुबई आणि आफ्रिकेतील काही देशांमध्ये अनेक शेल कंपन्या उभारल्या होत्या. त्याच्या नावावर नोंदणीकृत संस्थांमध्ये ईस्ट इंडिया कंपनी, स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन, आयलंड जनरल ट्रेडिंग कंपनी, इंदिरा ओव्हरसीज आणि कॅमेरून इस्पात या कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये मनी लाँडरिंग, हवाला व्यवहार आणि फसवणुकीच्या योजना चालवल्या गेल्या असण्याचा संशय आहे.

चौकशीत जैनने वादग्रस्त दिवंगत धर्मगुरु चंद्रस्वामीचा जवळचा सहकारी एहसान अली सय्यदच्या सूचनेवर काम केल्याचे कबूल केले आहे. हैदराबादचा मूळ रहिवासी असलेला एहसान आता तुर्कीचा नागरिक आहे. लंडनमध्ये राहत असताना जैनला या कंपन्या उभारण्यात मदत करत होता, असे समजते.

फसव्या कर्जाचा तपास

विशेष कार्य दलाच्या माहितीनुसार, 2008 ते 2011 दरम्यान एहसान आणि त्याच्या गटाने सुमारे 70 दशलक्ष पाउंडचे बनावट कर्ज मिळवले होते. त्यानंतर त्यांनी 25 दशलक्ष पाउंड कमिशन म्हणून घेतले आणि पळून गेले. 2022 मध्ये स्विस सरकारच्या विनंतीवरून लंडन पोलिसांनी एहसानला अटक केली होती. 2023 मध्ये लंडन न्यायालयाने त्याला स्वित्झर्लंडला प्रत्यार्पण करण्यास मान्यता दिली, जिथे त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत.

जप्त केलेल्या कागदपत्रांमधून जैनच्या नावावर भारत आणि परदेशातील अनेक बँक खाती समोर आली आहेत. ही खाती गोठवण्यात आली असून, त्याच्या बेकायदेशीर संपत्तीचा तपास सुरू आहे. पोलिस त्याच्या आर्थिक गुन्ह्यांचा शोध घेत आहेत.