Child Missing and Kidnapping Cases: राज्यात गेल्या काही दिवसांपासून बाल अपहरणाच्या (Child Missing and Kidnapping Cases) घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून त्यामुळे गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक प्रकरणांमध्ये अपहरण झालेल्या मुलांचा अद्याप शोध लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून तीव्र नाराजी आणि चिंता व्यक्त केली आहे.
राज ठाकरे म्हणाले की, एका अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहीत आहे. महाराष्ट्रात लहान मुले पळवण्याचे आणि बेपत्ता होण्याचे प्रमाण चिंताजनक वेगाने वाढत आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार २०२१ ते २०२४ या कालावधीत हे प्रमाण जवळपास ३० टक्क्यांनी वाढले आहे. लहान मुलांचे अपहरण करून त्यांना कामाला जुंपणाऱ्या, भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या सक्रिय असून त्या सर्रासपणे गुन्हे करत आहेत. मात्र, या टोळ्यांवर सरकार नेमकी कोणती कारवाई करत आहे, हे स्पष्ट दिसत नाही.
बाल अपहरणाच्या केसेसमध्ये किती मुले परत सापडली, अशी केवळ आकडेवारी देणारी सरकारी उत्तरे महाराष्ट्राला नकोत, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. एनसीआरबीची आकडेवारी म्हणजे प्रत्यक्षात पोलिसांकडे नोंद झालेल्या तक्रारींची संख्या आहे. मात्र, हजारो पालकांच्या तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचत तरी असतील का, हा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. अपहरणानंतर मुले परत सापडली, तरी त्या काळात त्यांच्या मनावर होणाऱ्या मानसिक आघाताचे काय? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
प्रति,
— Raj Thackeray (@RajThackeray) December 13, 2025
श्री. देवेंद्र फडणवीस,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
सस्नेह जय महाराष्ट्र,
एका अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहीत आहे. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार जरी गेलं…
ते पुढे म्हणाले की, रस्त्यावर, रेल्वे स्थानकांवर आणि बसस्थानकांवर लहान मुले भीक मागताना दिसतात. ती मुले नेमकी कोण आहेत? त्यांच्या सोबत असलेली माणसे त्यांचे खरेच आई-वडील आहेत का? याचा तपास करण्याची गरज आहे. वेळ पडल्यास डीएनए चाचणी करण्याचे आदेश सरकारने द्यायला नकोत का? आज राज्यात लहान मुले, तरुण मुली पळवल्या जात आहेत, जमिनी बळकावल्या जात आहेत, अशा गंभीर मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकत्र येऊन ठोस पावले उचलायला प्रशासनाला भाग पाडायला नको का?
राज ठाकरे म्हणाले की, हिवाळी अधिवेशन केवळ पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्यासाठीच असते का ? अधिवेशनादरम्यान अनेकदा मंत्री सभागृहात उपस्थित नसतात, त्यामुळे अशा गंभीर विषयांवर चर्चा होईल, अशी अपेक्षा करणेही अवाजवी वाट. मात्र, महाराष्ट्राची ही अपेक्षा आहे. शेवटी, हा विषय केवळ राज्यापुरता मर्यादित न ठेवता केंद्र सरकारने सर्व राज्यांशी चर्चा करून कृतिगट तयार करायला हवा. पण सध्या वंदे मातरम वर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असं वाटत नाही !
असो. आज राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने तुम्ही लक्ष घालून, फक्त अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणून नव्हे तर काहीतरी ठोस कृती करावी ही महाराष्ट्राची तुमच्याकडून अपेक्षा असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
आकडेवारी मोठी दिसते, पण ९० टक्क्यांहून अधिक मुली परत सापडतात- फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी अजून ते पत्र वाचलेले नाही. मात्र बेपत्ता होणाऱ्या मुलींच्या संदर्भात यापूर्वीही मी आकडेवारीसह त्यामागची कारणे स्पष्ट केली आहेत आणि किती मुली परत सापडतात हेही सांगितले आहे. एखादी मुलगी घरातून भांडणानंतर निघून गेली आणि तीन दिवसांनी परत आली, तरी त्या ठिकाणी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली जाते. त्यामुळे आकडेवारी मोठी दिसते. आमचा अनुभव असा आहे की एका वर्षात ९० टक्क्यांहून अधिक मुली पुन्हा सापडतात आणि पुढील दीड वर्षात उर्वरित प्रकरणांचीही उकल होते. सध्या त्यांनी नेमके काय पत्र लिहिले आहे ते मी वाचलेले नसल्याने त्यावर प्रतिक्रिया देऊ शकत नाही. मात्र जर काही शंका असतील, तर त्यांना नक्कीच उत्तर दिले जाईल.
योगेश कदम काय म्हणाले?
राज ठाकरे यांनी नेमके काय पत्र लिहिले आहे, याची मला माहिती नसल्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले. ते पुढे म्हणाले की, मात्र लहान मुले अचानक बेपत्ता होण्याच्या काही बातम्या आम्हीही पाहिल्या आहेत. अशा घटना घडल्यानंतर तपासासाठी विशेष मोहीम राबवली जाते. या मोहिमेदरम्यान अनेक वेळा मिसिंगची तक्रार दाखल नसतानाही मुले शोधून काढण्यात आली आहेत. अशा प्रकरणांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक मुले पुन्हा सापडतात. यातील काही मुले स्वतःहून घर सोडून गेलेली असतात, तर काही इतर कारणांमुळे बेपत्ता झालेली असतात. मात्र याचा अर्थ असा नाही की उर्वरित १० टक्के मुलांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यांचा शोध घेण्यासाठीही विशेष मोहिमा राबवण्यात येतात.
हा विषय गंभीर असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली यावर ठोस उपाययोजना राबवण्यात येत आहेत,” असे योगेश कदम यांनी स्पष्ट केले.
मुंबईत दिवसाला ४ ते ५ मुली बेपत्ता
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये धक्कादायक वाढ झाली आहे. पोलिसांच्या आकडेवारीनुसार, गेल्या दहा महिन्यांत (जानेवारी ते ऑक्टोबर) मुलींच्या अपहरण व बेपत्ता होण्याचे तब्बल १,१८७ गुन्हे दाखल झाले असून, सरासरी दिवसाला चार ते पाच मुली गायब होत आहेत. या वाढत्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मुंबई पोलिसांनी यापैकी १,११८ प्रकरणांची उकल केली असून उर्वरित सुमारे ७१ प्रकरणांचा तपास सुरू आहे. ऑक्टोबर महिन्यातच सर्वाधिक १३६ अपहरणाचे गुन्हे नोंदवण्यात आले, त्यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत महिलांसंबंधित एकूण ५,८८६ गुन्हे नोंद झाले असून त्यात १,०२५ बलात्काराच्या प्रकरणांचा समावेश आहे. यापैकी ५२६ गुन्हे अल्पवयीन मुलींशी संबंधित आहेत.
पोलीस तपासात मुली बेपत्ता होण्यामागे प्रेमप्रकरणातून पळून जाणे, घरगुती वादातून घर सोडणे, तसेच सेक्स रॅकेट आणि मानवी तस्करीचे प्रकार कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले आहे. काही प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलींची राजस्थान, गुजरातसारख्या राज्यांत लग्नासाठी तस्करी केल्याचेही उघड झाले आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत बहुतेक प्रकरणांची उकल केली असून, समुपदेशनानंतर मुलींना त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येत आहे. तरीही आर्थिक राजधानीत महिलांच्या व मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न कायम असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.









